वायनाड : भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या व्यथा संपूर्ण जगाच्या लक्षात आल्या आहेत. सारे जग शेतकरी आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहत आहे. पण, केंद्रातील मोदी सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे केली.
काँग्रेसतर्फे केरळमध्ये काढण्यात आलेल्या सहा किलोमीटरच्या ट्रॅक्टर रॅलीत राहुल गांधी सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या सभेत ते म्हणाले की, भारतात शेती हा सर्वांत मोठा म्हणजे तब्बल ४० लाख कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. शेतकऱ्यांच्या जिवावरच हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. पण, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. हा सारा व्यवसाय आपल्या दोन मित्रांच्या हाती सोपविण्यासाठीच तिन्ही कृषी कायदे करण्यात आले आहेत.
हे काळे कायदे रद्द व्हावेत, यासाठी जनतेने मोदी सरकारवर दबाव आणायला हवा, असे आवाहन करून राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जगाला समजल्या, कलाकारांना लक्षात आल्या. पण, सरकार त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. कारण त्यांना शेतकऱ्यांचे नव्हे, तर आपल्या काही मित्रांचेच भले करण्याची इच्छा आहे. (वृत्तसंस्था)
शेतकरी जगायलाच हवा
मोदी सरकार सतत भारतमातेच्या नावाचा जयघोष करते. तो सर्वांनीच करायला हवा. पण, या भारतमातेसाठी शेती हाच एकमेव सर्वांत मोठा व्यवसाय असून, तो टिकायला हवा, शेतकरी जगायला हवा. पण पंतप्रधान मोदी यांच्या सरकारचे सारे निर्णय मात्र शेती व शेतकरी यांच्या विरोधातील आहेत. - राहुल गांधी