अहमदनगर : विभागीय आयुक्तांनी महापालिकेच्या ४० कोटी रुपयांच्या मूलभूत निधी प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याच्या हालचाली सत्तापक्षाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सुरू केल्या आहेत. प्रस्तावात ज्या १४५ कामांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यातील दोन रस्त्यांची कामे पूर्वीच झाल्याचा दावा बोराटे यांनी केला आहे. शहरात मूलभूत सोईसुविधेसाठी शासनाने २० कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला. तितकाच हिस्सा टाकून महापालिकेला नगर शहरात ४० कोटी रुपयांची कामे करावयाची आहेत. प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. गत तीन वर्षापासून प्रस्तावाला मंजुरी मिळत नव्हती. युतीच्या नगरसेवकांनी तसेच सत्तापक्षाने बोराटे यांनीही प्रस्तावातील कामांना आक्षेप घेतला होता. आक्षेप दूर करत प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी झाला. आता निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर कामांना प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. मात्र, प्रस्तावात ज्या १४५ कामांना मंजुरी दिली, त्यातील दोन कामे अगोदरच महापालिकेने पूर्ण केली आहेत. या दोन कामांना महापालिकेने दिलेला कार्यारंभ आदेश, काम पूर्ण झाल्याचे छायाचित्र बोराटे यांच्याकडे असल्याचा दावा ते करत आहेत. तीच कामे पुन्हा प्रस्तावात करण्यात येणार आहेत. यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय बोराटे यांनी घेतला. त्यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव त्यांनी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
न्यायालयात जाण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू
By admin | Published: January 08, 2016 11:20 PM