नवी दिल्ली - 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगूल अखेर आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेबरोबरच देशात आदर्श आचार संहिता जाहीर झाली आहे.
महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया एप्रिल महिन्यात होणाऱ्या चार टप्प्यातील मतदानामध्ये आटोपणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला महाराष्ट्रातील सात मतदारसंघात मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला राज्यातील 10 मतदार संघात मतदान होईल. राज्यातील 14 मतदार संघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होईल. तर उर्वरीत 17 मतदारसंघांमध्ये 29 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा असून, सदस्यसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राज्यात शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे.