Counting Of Tiger: एक काळ होता, जेव्हा भारतात वाघांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी राहिली होती. पण, आज देशातील वाघांच्या संख्येने 3 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज(9 एप्रिल) देशातील वाघांच्या संख्येची नवीन आकडेवारी समोर आली आहे. टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर येथे एका कार्यक्रमात वाघांची ताजी आकडेवारी जाहीर केली.
पीएम मोदी म्हणाले की, नव्या आकडेवारीनुसार 2022 च्या अखेरपर्यंत भारतात वाघांची संख्या 3167 झाली आहे. भारताने 5 दशकांपूर्वी 1 एप्रिल 1973 रोजी वाघ वाचवण्याची सर्वात मोठी मोहीम सुरू केली होती. प्रोजेक्ट टायगर असे त्याला नाव देण्यात आले. तेव्हापासून देशातील वाघांची संख्या सातत्याने वाढत असून आज जगातील 70 टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. दरवर्षी ही लोकसंख्या 6 टक्क्यांनी वाढत आहे.
मोजणी कशी केली जाते?प्रकल्पाच्या सुरुवातीला 9 व्याघ्र प्रकल्पांचा त्यात समावेश करण्यात आला होता. आज 50 वर्षांनंतर 53 व्याघ्र झाले आहेत. हे प्रकल्प 75,000 चौरस किमी क्षेत्र व्यापतात. एवढ्या मोठ्या परिसरात वाघांची गणना करणे सोपे काम नाही. 1973 मध्ये जेव्हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा वनविभागाचे कर्मचारी वाघाच्या पायाचे ठसे चिन्हांकित करण्यासाठी काच आणि बटर पेपर वापरत होते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की माणसांप्रमाणेच प्रत्येक वाघाचे स्वतःचे वेगळे पाऊल ठसे असतात. वाघांचा मागोवा घेण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. रेंजर्स वाघाच्या पंजाचे ठसे शोधतात आणि भविष्यात त्या वाघाचा मागोवा घेण्यासाठी बटर पेपरवर त्याची नोंद ठेवतात. पण, हे काम इतके सोपे नाही. कारण, वाघाच्या उभ्या, विश्रांती घेताना आणि धावतानाच्या पायाच्या ठशांमध्ये फरक असतो. कालांतराने वाघ मोजण्याची नवीन पद्धत विकसित झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नमुने गोळा केले जातात, त्या आधारे वाघांच्या संख्येचा अंदाज लवकर लावला जातो.