लखनऊ : उत्तर प्रदेशमधील ६० हजार कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या ८१ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकार्पण केले. आदित्य बिर्ला ग्रुप, अदानी ग्रुप, एस्सेल, आयटीसी अशा मोठमोठ्या उद्योगसमुहांकडून ही गुंतवणूक करण्यात आली असून हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर रोजगाराच्या दोन लाख नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.या कार्यक्रमाला आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला, अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाषचंद्र, आयटीसीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांसह देशातील ८० नामवंत उद्योजक उपस्थित होते. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकादारांची परिषद आयोजिण्यात आली होती. त्यात ज्या गुंतवणूूक प्रस्तावांचे सामंजस्य करार झाले होते त्या प्रस्तावांचे लोकार्पण रविवारी करण्यात आले.यावेळी मोदी म्हणाले, येत्या मार्च महिन्यापर्यंत प्रत्येक घरामध्ये वीज पोहोचलेली असेल. त्यादृष्टीनेच केंद्र सरकार वेगाने काम करत आहे. उत्तर प्रदेशमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे ही साधी गोष्ट नाही. हेतू स्वच्छ असतील तर त्याची फळेही चांगलीच मिळतात. भारत हा मोबाईल निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र बनला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोबाइल निर्मितीचे ५० उद्योग कार्यरत आहेत.आश्वासनांचे काय झाले?उत्तर प्रदेश निवडणुकीतील जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अजून का झाली नाही, असा सवाल समाजवादी पक्षाने टिष्ट्वटरवर झळकविलेल्या एका व्हिडिओ फितीद्वारे केला आहे. (वृत्तसंस्था)सपावर टीकामागील बिगरभाजपा सरकारांचे हेतू स्वच्छ नव्हते व विकास साधण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीही त्यांच्याकडे नव्हती. त्यांच्या भोंगळ कारभारामुळेच देश अनेक क्षेत्रांत मागासलेला राहिला, असा आरोपही नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.
प्रकल्पांचा धडाका; ६० हजार कोटींच्या ८१ प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 12:26 AM