नवी दिल्ली : प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आणि सलून चेनचे मालक जावेद हबीब यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला. यासंबंधीचा जावेद हबीब यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने जावेद हबीब यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. भाजपात प्रवेश करतेवेळी जावेद हबीब म्हणाले की, ''आतापर्यंत मी केसांचा चौकीदार होतो, आज मी देशाचा चौकीदार झालो आहे''.
लोकसभा निवडणुक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी जावेद हबीब यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले आहे. तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 16 राज्यातील 118 लोकसभा मतदार संघातील जागांसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 14 जागांचा समावेश आहे.
दरम्यान, जावेद हबीब यांनी लंडन येथील 'मॅरिस स्कूल ऑफ हेअर ड्रेसिंग' आणि 'लंडन स्कूल ऑफ आर्ट अॅण्ड फॅशन'मधून 'आर्ट अॅण्ड सायन्स ऑफ हेअर स्टाइलिंग अॅण्ड ग्रूमिंग'चं त्यांनी शिक्षण घेतले आहे. देशभरात जावेद हबीब यांच्या मालकीची अनेक सलून्स आहेत.