अहमदाबाद : गुजरातमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्यांमध्ये भेदभाव करण्यात आला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी पी.सी. पांडे यांना वाचविण्यासाठीच मानक प्रक्रिया बाजूला सारून गीता जोहरी यांना राज्याच्या महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे, असा आरोप गुजरातचे माजी पोलीस महानिरीक्षक डी.जी. वंजारा यांनी केला आहे. इशरत जहाँ आणि सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातील आरोपी असलेले वंजारा हे सध्या जामिनावर आहेत.वंजारा यांनी गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव जी.आर. एलोरिया यांना पत्र लिहून पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्यांवरून शहा यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. राजस्थान सरकारच्या धर्तीवरच गुजरातने आपल्यासह अन्य १५ सहआरोपी पोलीस अधिकाऱ्यांनाही बढती द्यावी, अशी मागणी वंजारा यांनी या पत्रात केली आहे. गीता जोहरी यांची इशरत प्रकरणातून नुकतीच सुटका करण्यात आली होती. जोहरी यांना दिलेली बढती बेकायदेशीर आणि घाईगडबडीत करण्यात आली आहे. आम्हाला अडकवून कोणी नामानिराळे होत असतील तर आम्ही तसे होऊ देणार नाही. कोणालाही उजळ माथ्याने फिरू देणार नाही, असा इशारा वंजारा यांनी दिला. पी.पी. पांडे आणि अन्य अधिकाऱ्यांना बढती नाकारण्याची सरकारची कृती केवळ बेकायदेशीर, अवैध आणि अविवेकीच नाही तर ती पूर्णपणे लहरी व अन्यायकारक स्वरूपाची आहे, असेही वंजारा यांनी या पत्रात म्हटले आहे. गीता जोहरी यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे, हे कबूल करून वंजारा म्हणतात, जोहरी यांना निर्दोष ठरविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सीबीआयतर्फे आव्हान दिले जाणार आहे किंवा काय याची शहानिशा केल्यानंतरच गुजरात सरकारने ही बढती द्यायला हवी होती. काही आरोपींना, विशेषत: शहा आणि पांडे यांना वाचविण्यासाठीच जोहरी यांना चुकीच्या पद्धतीने बढती दिली आहे.