शीलेश शर्मा, नवी दिल्लीविदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत दिलेले भावुक निवेदन संपत असतानाच काँग्रेसने संसदेबाहेर त्यांच्या निवेदनाची चिरफाड करणारा पत्रव्यवहार जाहीर करीत रोखठोक प्रत्युत्तर दिले. त्यातून काँग्रेस आणि सरकारमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.लोकसभेत विरोधकांच्या अनुपस्थितीचा लाभ घेत स्वराज यांनी भावपूर्ण निवेदनात स्वत: निर्दोष असल्याचे स्पष्ट करतानाच एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीचा आधार घेत विरोधकांना दोष सिद्ध करण्याचे आव्हानही दिले होते. काँग्रेसचे प्रवक्ते माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी स्वराज यांचा दावा खोटा पाडताना मे - जून २०१३ ते १ आॅॅगस्ट २०१४पर्यंतचा संपूर्ण पत्रव्यवहार समोर आणला. ३१ जुलै २०१४ रोजी ब्रिटनच्या गृहमंत्रालय समितीचे अध्यक्ष कीथ वाझ यांनी ब्रिटनच्या व्हिसा विभागाचे संचालक रपसन यांना पाठवलेल्या ई-मेलचाही त्यात समावेश आहे. ललित मोदींना प्रवासाचे दस्तावेज दिल्यास भारत सरकारचा कोणताही आक्षेप असणार नाही, असे विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केल्याचे ई-मेलमध्ये नमूद आहे. स्वराज यांनी जेम्स बेवन यांच्याशीही चर्चा केली आहे, ते सध्या सुटीवर आहेत. भारत सरकारने यापूर्वी विरोध केला होता मात्र स्वराज यांनी आता विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे, असेही कीथ यांनी त्यात नमूद केले आहे. बान की मून वगळता अन्य सर्व जण या प्रकरणात रुची घेत आहेत, अशी फिरकीही कॅथ यांनी घेतल्याचे दिसून येते.
स्वराज यांच्या बचावाला काँग्रेसचे ‘पुराव्या’ने उत्तर
By admin | Published: August 07, 2015 1:52 AM