भोपाळ - मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी भाजपानेकाँग्रेसवर टीका केली. शेतकरी कर्जमाफी निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार काँग्रेसवर केला जात होता. याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी अनोखी शक्कल लढवत थेट मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचे घर गाठले.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मध्य प्रदेशमधील मंत्री पीसी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवराज चौहान यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शिष्टमंडळाने कर्जमाफी केल्याचे पुरावे म्हणून दस्तावेज दिले. तब्बल एक गाडी भरुन हे दस्तावेज शिवराज चौहान यांच्या घरी आणून त्यांच्यासमोर ही सगळी कागदपत्रे ठेवण्यात आली. शिवराज चौहान यांना देण्यात आलेली सर्व कागदपत्रे हे शेतकरी कर्जमाफीचे पुरावे आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांची नावे, त्यांचे मोबाईल नंबर, कर्जमाफीचं प्रमाणपत्र, कोणत्या बँकेचे कर्ज घेतले यासह संपूर्ण माहिती देण्यात आली असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला.
मध्य प्रदेशमध्ये शेतकरी कर्जमाफीवरुन भाजपाकडून काँग्रेसवर घेरण्याचे प्रयत्न सुरु होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याकडून कमलनाथ सरकारवर आरोप केले जात होते. भाजपाने शनिवारी काँग्रेस सरकारविरोधात आरोपपत्र प्रकाशित करत शेतकरी कर्जमाफीचा दावा खोटा असल्याचं सांगण्यात आलं. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली.
यावेळी बोलताना सुरेश पचौरी यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफीचं प्रकरण कुठेही लपलेलं नाही. सर्व माहिती ऑनलाइन आहे. शिवराज चौहान आणि भाजपा लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम करत आहे. खोट्या माहितीच्या आधारे आरोप केले जात आहेत त्यामुळेच आम्ही शेतकरी कर्जमाफीचे सर्व पुरावे त्यांना दिले आहेत. शिवराज चौहान सत्तेत असताना त्यांनी कर्जमाफीचा दावा केला होता मात्र तो दावा पोकळ सिद्ध झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांना फसवून काही होणार नाहीमुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडून कृषी विभागाचे दस्तावेज मला पाठवण्यात आले. मला बँकेची यादी द्यावी कारण बँकांकडून कर्जमाफी केली जाणार आहे. फक्त वातावरण खराब करण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी असा प्रकार काँग्रेसकडून करण्यात आला. फक्त यादी बनविल्याने कर्जमाफी होत नाही. 48 हजार कोटींची कर्जमाफी देणार सांगितले अन् फक्त 1300 कोटी रुपये दिले तर कर्जमाफी कशी होणार? असा सवाल शिवराज चौहान यांनी काँग्रेसला केला.