मुंबई : हिट अँड रन केसप्रकरणी सलमान खानविरुद्ध सरकारी वकिलांनी नोंदवलेल्या साक्षी-पुराव्यांत अनेक त्रुटी राहिल्याचे उच्च न्यायालयाने निकाल वाचनावेळी निदर्शनास आणले. सरकारने पुराव्यांची शृंखला नीट गुंफलेली नसल्याचेही उच्च न्यायालयाने म्हटले. सोमवारपासून निकाल वाचनास सुरुवात केलेल्या उच्च न्यायालयाने अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. येत्या एक-दोन दिवसांत सलमान खानच्या अपिलावरील निकाल अपेक्षित आहे.सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवत, सत्र न्यायालयाने सलमानला ६ मे रोजी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात सलमानने उच्च न्यायालयात अपिल केले. या अपिलावरील सुनावणी न्या. ए. आर. जोशी यांच्यापुढे होती.निकाल वाचनास सुरुवात झाल्यानंतर न्या. जोशी यांनी तपास यंत्रणेने आणि सरकारी वकिलांनी साक्षी-पुरावे नोंदवताना राहिलेल्या त्रुटी निदर्शनास आणल्या.सलमानला भाभा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला रक्ताचे नमुने घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सहायक केमिकल अॅनलायझरने त्याच्या मुखाला मद्याचा वास येत असल्याने त्याच्या शरीरातील ६ एमएल रक्त तपासण्यासाठी घेतले. हे रक्त दोन वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये प्रत्येकी तीन एमएल भरण्यात आले. मात्र, लॅबमध्ये तपासण्यासाठी नेण्यात आल्यावर एका बाटलीत चार एमएल रक्त आढळून आले. रक्ताच्या नमुन्याच्या बाटल्या २८ सप्टेंबरपासून १ आॅक्टोबरपर्यंत तशाच होत्या. चाचणी करण्यात आली नव्हती व संबंधित ठिकाणी रक्त शीतकपाटात ठेवण्याची सोयही उपलब्ध नव्हती, तसेच या दोन्ही बाटल्या सीलबंदही नव्हत्या, असे न्या. जोशी यांनी निकालात म्हटले आहे. तसेच जे. डब्ल्यू. मॅरिएटमध्ये पार्किंग स्लॉटमध्ये काम करणाऱ्या कल्पेश वर्मानेही सलमान गाडी चालवत होता, असे कुठेही स्पष्ट न म्हटल्याचे न्या. जोशी यांनी निकालात म्हटले आहे. सलमानने टीप दिली, तेव्हा तो ड्रायव्हिंग सीटवर बसला नव्हता, असे वर्मा याने स्पष्ट म्हटले आहे. त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे सलमानने रेनबो हॉटेलमध्ये मद्यपान केले की नाही, याबाबतही संदिग्धता निर्माण झाली आहे. ज्या वेटरला सलमानने आॅर्डर दिली, त्यानेच सलमान काहीतरी द्रव्य पित होता. ते मद्यच होते की नाही, हे माहीत नसल्याची साक्ष नोंदवली आहे. न्या. जोशी यांनी याचीही दखल घेतली आहे. बुधवारीही निकालवाचन सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)
सरकारी वकिलांच्या साक्षी-पुराव्यांत त्रुटी
By admin | Published: December 09, 2015 1:15 AM