ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - देशद्रोहाच्या गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेला जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने देशविरोधी घोषणा दिल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे पीटीआयने केंद्रीय गृहमंत्रालयातील एका अधिका-याच्या हवाल्याने म्हटले आहे.
जेएनयूच्या कार्यक्रमात कन्हैयाने प्रक्षोभक भाषणही दिले नसल्याचे गृहमंत्रालयातील सूत्रांनी म्हटले आहे. कन्हैया कुमार विरोधात देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करताना दिल्ली पोलिसातील काही अधिका-यांनी अतिउत्साह दाखवल्याचे गृहमंत्रालयातील अधिका-यांनी सांगितले.
कन्हैयाची दोन दिवसांची पोलिस कोठडी आज संपणार असून, त्याला दिल्ली न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दहशतवादी अफजल गुरुच्या स्मरणार्थ झालेल्या कार्यक्रमाला कन्हैया उपस्थित होता. पण त्याने देशविरोधी घोषणा दिलेल्या नाहीत किंवा देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध होईल असे भाषणही केलेले नाही असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले.