इस्टेट ब्रोकरचे १० लाख हातोहात लांबविले
By admin | Published: August 07, 2016 9:52 PM
जळगाव : नातेवाइकांकडून उसनवारीने घेतलेले पैसे देण्यासाठी मुंबईला जात असलेल्या जळगावातील इस्टेट ब्रोकरच्या हातातून १० लाख रुपये असलेली बॅग स्पोर्टस् बाइकवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी लांबविली. रविवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास बहिणाबाई उद्यानाजवळ ही घटना घडली. बॅग हिसकावल्यानंतर दोघे चोरटे वार्याच्या वेगाने महामार्गावरून पाळधीच्या दिशेने पसार झाले.
जळगाव : नातेवाइकांकडून उसनवारीने घेतलेले पैसे देण्यासाठी मुंबईला जात असलेल्या जळगावातील इस्टेट ब्रोकरच्या हातातून १० लाख रुपये असलेली बॅग स्पोर्टस् बाइकवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी लांबविली. रविवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास बहिणाबाई उद्यानाजवळ ही घटना घडली. बॅग हिसकावल्यानंतर दोघे चोरटे वार्याच्या वेगाने महामार्गावरून पाळधीच्या दिशेने पसार झाले.शिवाजीनगर भागातील उस्मानिया पार्कमधील रहिवासी शेख अर्शद शेख सलीम (वय ४२) हे इस्टेट ब्रोकर असून ते प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा या शिक्षिका आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी घराच्या बांधकामासाठी मुंबईत मलाड येथे राहणारे त्यांचे नातेवाइक सिराज खान यांच्याकडून उसनवारीने १० लाख रुपये घेतलेले होते. हे पैसे परत करण्यासाठी त्यांनी त्यांचा एक प्लॉट विकला होता. या व्यवहारातून आलेले १० लाख रुपये त्यांनी २ दिवसांपूर्वी आयडीबीआय बॅँकेतून काढलेले होते. परंतु जळगाव व मुंबई दोन्ही ठिकाणी पाऊस सुरू असल्याने ते पैसे देण्यासाठी गेलेले नव्हते. मात्र, सिराज खान यांना पैशांची आवश्यकता असल्याने ते शेख अर्शद यांना मोबाइलवरून सतत पैसे देण्याची मागणी करीत होते. म्हणून शेवटी शेख अर्शद हे रविवारी मुंबईला जाणार होते. त्यासाठी त्यांनी आकाश ट्रॅव्हल्सचे तिकीट बुकिंग केलेले होते.रिक्षाचा गॅस संपला अन्...रविवारी शेख अर्शद व त्यांच्यासोबत त्यांची सासू नजमुन्नीसा खान हे दोघे जण ट्रॅव्हल्सने मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी काळ्या रंगाच्या बॅगेत १० लाख रुपये ठेवलेले होते. ट्रॅव्हल्स चालकाने त्यांना महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटल स्टॉपजवळ रात्री ८.३० वाजता थांबण्यास सांगितले होते. म्हणून ते उस्मानिया पार्कमधून रात्री ७.३० वाजता (एमएच १९ व्ही ६४०१) क्रमांकाच्या रिक्षाने त्याठिकाणी येत होते. मात्र, बहिणाबाई उद्यानाजवळ रिक्षाचा गॅस संपला. तेथून अग्रवाल हॉस्पिटलचा स्टॉप जवळच असल्याने ते पायी चालत जाणार होते. रिक्षातून उतरल्यानंतर शेख अर्शद सासू नजमुन्नीसा यांची बॅग बाहेर काढत असताना त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या स्पोर्टस् बाइकवरून आलेल्या दोन्ही चोरट्यांच्या त्यांच्या हातातील १० लाख रुपये ठेवलेली बॅग त्यांना काही कळण्याच्या आत हिसकावून पाळधीच्या दिशेने पोबारा केला. या प्रकाराने ते भांबावून गेले. पैशांची बॅग चोरली, हे समजल्यानंतर रिक्षा चालक व त्यांनी त्यांच्या मागे पळण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटे क्षणातच पसार झाले.