संपत्तीच्या वादातून निवृत्त सीएमओच्या मुलाने बहीण आणि तिच्या ३ वर्षांच्या लेकीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यात घडली आहे. आरोपीने बहिणीच्या पतीवरही जीवघेणा हल्ला केला होता. मात्र ते सुदैवाने बचावले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक टिमने घटनास्थली पोहोचून तपासाला सुरुवात केली.
या प्रकरणी निवृत्त सीएमओ लवकुश सिंह यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी हर्षवर्धन चौहान हा माझा मुलगा आहे. त्यानेच माझी मुलगी आणि नातीची हत्या केली. माझ्या देखभालीसाठी माझी मुलगी आणि नात माझ्यासोबत राहायची. त्यामुळे माझा मुलगा हर्षवर्धन हा नाराज होता. तसेच संपत्तीच्या वाटपावरून तो संतापलेला होता. त्यामधूनच त्याने आपली ४० वर्षांची बहीण ज्योती आणि तिची २ वर्षांची मुलगी ताशू यांची गोळ्या झाडून हत्या केली. तसेच घटनास्थळावरून फरार झाला.
मात्र आरोपी हर्षवर्धन चौहान याला पोलिसांनी शिताफीने पकडण्यात यश मिळवलं आहे. तसेच त्याची कसून चौकशी केली जात आहे. हे खून मालमत्तेबाबतचा वाद आणि गृहकलहामधून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच गुन्हा नोंदवून पुढील तपास केला जात आहे.