Prophet Remarks Row: भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी त्यांच्याविरोधात अनेक राज्यात एफआयआर दाखल करण्यात आल्या. त्याप्रकरणी शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, यात त्यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. 'कोणत्याही राज्यातील पोलिसांनी त्यांना अटक करू नये', असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे.
अटकेला स्थगितीप्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्य करून वादात सापडलेल्या शर्मा यांच्याविरोधात देशातील अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सध्या त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. नुपूरने त्यांच्या याचिकेत देशभरात दाखल झालेले विविध खटले दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याची आणि अटकेला स्थगिती देण्याचीही मागणी केली होती.
शर्मांना जीवे मारण्याची धमकी
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने 1 जुलैच्या आदेशानंतर शर्मा यांना कथित जीवे मारण्याच्या धमक्यांची दखल घेतली आणि भविष्यातील एफआयआर/तक्रारींमध्येही त्यांना दंडात्मक कारवाईपासून मुक्त केले. हे प्रकरण 26 मे रोजी एका टीव्ही डिबेट कार्यक्रमादरम्यान पैगंबर यांच्यावरील कथित वादग्रस्त टिप्पणीशी संबंधित आहे. हा आदेश सुनावताना खंडपीठाने सलमान चिश्ती याचीही दखल घेतली. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली होती.
सुनावणीदरम्यान न्यायालय काय म्हणाले?आजच्या सुनावणीदरम्यान नुपूर शर्माची बाजू मांडणारे वकील मनिंदर सिंग यांनी सांगितले की, शर्मांच्या जीवाला धोका आहे. पाकिस्तानातून त्यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केला. न्यायाधीश म्हणाले की, तुम्ही प्रत्येक राज्याच्या कोर्टात जावे, हा आमचा हेतू नाही, आम्ही ऑर्डरमध्ये काही बदल करू. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार असून तोपर्यंत नुपूर शर्मावर कोणतीही कारवाई (अटक) केली जाणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.