लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. शनिवारी २० हजारांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण आढळून आले. या संसर्गातून ९९ लाखांपेक्षा अधिक जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९६.१२ टक्के आहे. सध्या अडीच लाख रुग्णांवरच उपचार सुरूआहेत.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात १,०३,०५,७८८ कोरोना रुग्ण असून, त्यापैकी ९९,०६,३८७ जण बरे झाले. शनिवारी १९,०७९ नवे रुग्ण सापडले व २२४ जण मरण पावले. त्यामुळे बळींची एकूण संख्या १,४९,२१८ झाली. देशात २,५०,१८३ सक्रिय रुग्ण असून, त्यांचे प्रमाण २.४३ टक्के आहे.
जगभरात ८ कोटी ४३ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ५ कोटी ९६ लाख लोक बरे झाले. भारतामधील कोरोना बळी व सक्रिय रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा कमी आहे. अमेरिकेत २ कोटी ६ लाख कोरोना रुग्ण असून, त्यापैकी १ कोटी २१ लाख जण बरे झाले आहेत. त्या देशात ८० लाख सक्रिय रुग्ण आहेत व ३ लाख ५६ हजार जणांचा कोरोनामुळे बळी गेला.
जर्मनीत नवा विषाणू आढळला नोव्हेंबरमध्येब्रिटनमधील नवा कोरोना विषाणू जर्मनीमध्ये नोव्हेंबर महिन्यात आढळला होता. जर्मनीमध्ये १७ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील १३ लाख लोक बरे झाले.