ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - आम आदमी पक्षाच्या सरकारने आमदारांच्या स्थानिक विकास निधीमध्ये २५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सध्या ४ कोटी असलेल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीमध्ये १४ कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव आपने ठेवला आहे.
मतदारसंघातील स्थानिक विकास कामांसाठी आमदारांकडे पुरेसा निधी असावा यासाठी निधीमध्ये वाढ करावी अशी आपची भूमिका आहे. मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. सध्याच्या नियमानुसार आमदार निधीतील १ कोटी रुपये दिल्ली जल बोर्डाच्या कामासाठी द्यावे लागते.
त्यानंतर विकासकामांसाठी आमदारांकडे फार कमी निधी रहातो म्हणून दिल्ली सरकारने आमदारनिधीत घसघशीत वाढ सुचवली आहे. २०११ मध्ये शीला दिक्षित सरकारने आमदार निधी दोन कोटीहून चार कोटीपर्यंत वाढवला होता.