नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यात भारतमातेच्या 40 जवानांना वीरमरण आलं. त्यानंतर जवळपास सर्वच देशातून या घटनेचा निषेध नोंदवला गेला. परंतु पाकिस्ताननं या घटनेचा अद्यापही निषेध नोंदवलेला नाही, उलट पाकिस्ताननं भारतालाच कारवाई कराल, तर प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी दिली आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुरावे मागत असले तरी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर आता जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. भारतानंही कूटनीतीचा वापर करून पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव फ्रान्स सरकार संयुक्त राष्ट्र संघात मांडणार आहे. विशेष म्हणजे फ्रान्स हा प्रस्ताव अमेरिकेच्या सहाय्यानं मांडणार असून, त्यामुळे चीनच्या विरोधाकडे फारचं लक्ष न देण्याचा निर्णय इतर देशांनी पत्करला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत फ्रान्स सरकार हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात आणणार आहे.
भारताला मोठं यश, संयुक्त राष्ट्रात फ्रान्स अमेरिकेच्या मदतीनं मांडणार मसूद अजहरवर बंदीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 10:03 AM