जम्मू : शांतता आणि सामंजस्य हवे असेल तर पाकिस्तानने दहशतवादावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी म्हटले आहे. सांबा आणि कठुआ येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. हे दहशतवादी हल्ले म्हणजे शांतता प्रक्रिया हाणून पाडण्यासाठी रचलेला कट असल्याचे सईद म्हणाले.जम्मू-काश्मीर विधानसभेत बोलताना सईद म्हणाले की, राज्याच्या जनतेने आपला कौल दिला आहे. अशा हल्ल्यांच्या निषेधासाठी आपण प्रस्ताव आणला पाहिजे. पाकचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या कार्यकाळात सीमा व नियंत्रणरेषेच्या दोन्ही बाजूंना शांतता नांदत होती.दरम्यान, सांबा व कठुआ येथील पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करणारा ठराव दोन्ही सभागृहांत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. या हल्ल्यामागे असलेल्या शक्तींना ओळखून त्यांचा बीमोड करणे आवश्यक आहे. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत भारत सरकारने पाकला समज दिली पाहिजे, असे या ठरावात म्हटले आहे. सांबा व कठुआ येथील हल्ल्यांचा निषेध करणारा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात नॅशनल कॉन्फरन्सच्या सदस्यांनी सभात्याग केला. हल्ल्यावर चर्चा व्हावी व मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशा मागणीचा प्रस्ताव नॅकॉचे देवेंद्रसिंग राणा यांनी मांडला. (वृत्तसंस्था)राज्यातील लोकांनी दृढनिश्चय केलेला आहे आणि अशा दहशतवादी हल्ल्यांमुळे ते मुळीच डगमगणार नाहीत. पाकिस्तानला जर शांतता आणि सलोखा हवा असेल तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या प्रशासनाने दहशतवादावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे सईद म्हणाले.
पाकपुरस्कृत हल्ल्याचा निषेध ठराव
By admin | Published: March 23, 2015 2:20 AM