नवी दिल्ली, दि. 6 - देशातील तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काम करणारी संस्था नेहरु युवा केंद्र संघटनमधून 'नेहरु' शब्द वगळण्यात यावा असा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. स्पोर्ट्स आणि यूथ अफेअर्स मंत्रालयाने यासंबंधी प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर केला जाईल. नेहरु युवा केंद्र संघटन स्वायत्त संस्था आहे. राजीव गांधी पंतप्रधान असता या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेचं नाव बदलून नॅशनल युवा केंद्र संघटन करण्यात यावं अशी मागणी आहे असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
1972 रोजी जेव्हा देशात स्वातंत्र्याची 25 वर्ष पुर्ण झाल्याचा आनंद साजरा केला जात होता, तेव्हा नेहरु युवा केंद्र योजना सुरु करण्यात आली होती. गावांमधील कमी शिकलेल्या तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासाला मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. सुरुवातील 42 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली होती. मात्र 1986 - 87 राजीव गांधी पंतप्रधान असताना 311 जिल्ह्यांमध्ये विस्तार करत या योजनेला एका स्वायत्त संस्थेचं रुप देण्यात आलं. 1987 रोजी नेहरु युवा केंद्र संघटन म्हणून या संस्थेची नोंदणी करण्यात आली.
नेहरु शब्द हटवण्यामागची कारणेही प्रस्तावात देण्यात आली आहेत. प्रस्तावात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, ही संस्था आता देशभरात सक्रिय असून जवळपास 623 जिल्ह्यांमध्ये काम करत आहे. याशिवाय संस्थेच्या मदतीने शहरातील तरुणांनाही प्रशिक्षण मिळत आहेत. याशिवाय क्रिडा मंत्रालयाचं म्हणणं आहे की, याच्या माध्यमातून अनेक गोष्टींची माहिती देण्याचं कामही केलं जातं, तसंच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया, नमामी गंगे सारख्या योजनांबद्दल देशात जागरुकता पसरवण्याचं कामही करत आहेत. त्यामुळे याचं नाव बदलून नॅशनल युवा केंद्र संघटन करण्यात आलं पाहिजे असा दावा करण्यात आला आहे.
प्रस्तावात संस्थेचं नाव बदलण्यात आल्यानंतरही संक्षिप्त नाव NYKS असंच राहिल अशी माहिती देण्यात आली आहे. कारण नेहरु नाव काढून नॅशनल शब्द जोडला जात आहे. यामुळे गेल्या तीन दशकात जो ब्रॅण्ड उभा राहिला आहे त्याला फटका बसणार नाही असं सांगण्यात आलं आहे.
नेहरु युवा केंद्र संघटनच्या बैठकीत नाव बदलण्याच्या विषयावर चर्चा झाल्याचं एका अधिका-याने मान्य केलं आहे. मात्र अद्याप त्याला संमती मिळालेली नाही. केंद्रात भाजपा सत्तेत आल्यापासूनच संस्थेचं नाव बदलण्यावर चर्चा सुरु होती.