नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेने आदर्श वस्तू व सेवा कर विधेयकात शिखर दर (कराचा सर्वोच्च दर) १४ टक्क्यांवरून २0 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भविष्यात कराच्या दरात वाढ करायची झाल्यास पुन्हा संसदेकडे जाण्याची गरज पडू नये, यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.या प्रकरणाशी संबंधित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिखर दरातील बदलामुळे कराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल होणार नाही. सध्या ५, १२, १८ आणि २८ टक्के असे जीएसटीचे स्लॅब प्रस्तावित करण्यात आले आहेत. भविष्यात गरज पडल्यास बदल करणे सोपे जावे यासाठी शिखर दर २0 टक्के प्रस्तावित केले आहे. आदर्श जीएसटी कायद्याचा मसुदा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सार्वजनिक करण्यात आला होता. यात जीएसटीचा शिखर दर १४ टक्के ठेवण्यात आला होता. १४ टक्के केंद्रीय जीएसटी आणि तेवढाच राज्या जीएसटी असे एकत्रित २८ टक्के कर प्रस्तावित करण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जीएसटीचा शिखर दर २0 टक्के करण्याचा प्रस्ताव
By admin | Published: March 03, 2017 4:33 AM