प्रतिनिधी, घुमान (संत नामदेवनगरी) मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा, हे मराठी माणसाला पडणारे स्वप्न सध्या तरी स्वप्न उरले आहे. केंद्राच्या विविध खात्यांच्या फेऱ्यांमध्ये हा प्रस्ताव अडकून पडल्याने साहित्य संमेलनरूपी मुहूर्तही आता हुकला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना यास दुजोरा दिला. पत्रकारांनी त्यांना मराठीच्या अभिजात दर्जाविषयी विचारले असता, केंद्राने यासाठी ८० कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, हे आर्थिक कारण जोडले गेल्याने केंद्राकडे असलेल्या या प्रस्तावाशी आता केंद्रीय अर्थखाते, मनुष्यबळ व सांस्कृतिक विभागाचा संबंध जोडला गेला आहे. त्यामुळे प्रस्तावाची फाईल या सर्व विभागांकडे जात असल्याने त्याबाबत अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याची कबुली तावडे यांनी दिली. आता महाराष्ट्र दिनीतरी ही घोषणा होणार का? याची उत्सुकता आहे.
मराठीच्या अभिजाततेचा प्रस्ताव फाईलमध्येच अडकला
By admin | Published: April 06, 2015 2:56 AM