प्रज्ञा - फिरत्या लोकन्यायालयात तेरा खटले निकाली
By admin | Published: July 29, 2015 12:42 AM
जेजुरी : येथील सांस्कृतिक भवनाच्या आवारात मोबाईल व्हॅन लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. मोबाईल व्हॅनमध्ये झालेल्या लोकन्यायालयामध्ये दहा खटले व तीन अदखलपात्र गुन्हे तडजोडीमध्ये निकाली काढण्यात आले.
जेजुरी : येथील सांस्कृतिक भवनाच्या आवारात मोबाईल व्हॅन लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. मोबाईल व्हॅनमध्ये झालेल्या लोकन्यायालयामध्ये दहा खटले व तीन अदखलपात्र गुन्हे तडजोडीमध्ये निकाली काढण्यात आले. तालुका विधी सेवा समितीने जेजुरी नगरपालिका व पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. टी. ढवळे, सासवडचे दिवाणी न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. एन. फटांगरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर, सासवड न्यायालयातील वरिष्ठ लिपिक एन. आर. बोत्रे, परशुराम देशमुख, श्रीमती एस. आर. पोतदार, डॉ. नारायण टाक आदी उपस्थित होते. लोकन्यायालयामध्ये दहा खटले व तीन अदखलपात्र गुन्हे तडजोडीमध्ये निकाली काढण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पती-पत्नीमधील वाद, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, रस्त्यावरील अतिक्रमणे यांचा समावेश होता. जेजुरी पोलिसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सासवड न्यायालयात लोकांना जावे लागते; परंतु आज जेजुरीतच स्वत: न्यायाधीशांनी येऊन निकाल दिल्याने वादी-प्रतिवादींच्या चेहर्यावर आनंद उमटला. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी नोटिसा देऊन संबंधितांना बोलावले होते. पती-पत्नीच्या वादामध्ये न्यायमूर्तींनी दोघांनाही समज दिली व परत भांडू नका, सुखाने संसार करा, असा सल्लाही दिला. वाहतुकीचे नियम मोडणार्या चालकांना दोनशे रुपयांपासून एक हजारांपर्यंत दंड करण्यात आला. गुन्हा कबूल करून सर्व वाहनचालकांनी दंडाची रक्कम भरल्याने आलेले सर्व खटले निकाली काढण्यात आले. या वेळी पंच म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खाडे व शिवराज झगडे यांनी काम पाहिले. मोबाईल व्हॅनमधील न्यायालयाची रचना पाहण्यासाठी येथील नागरिकांनी गर्दी केली होती. बुधवारी (दि. २९) मोबाईल लोकन्यायालयाद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक व विविध सरकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे. दुपारी चार वाजता होणार्या कार्यक्रमात सासवडचे सहदिवाणी न्यायाधीश श्रीकृष्ण इनामदार, बी. एस. भिसे, डॉ. नारायण टाक, समीर भूमकर मार्गदर्शन करणार आहेत.फोटो : फिरत्या लोकन्यायालयात जेजुरीतील खटले निकाली काढताना. ०००००