बेळगाव/चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ जैन समाजबांधवांनी रविवारी बेळगावात सुवर्ण विधानसौधसमोर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दीड तासांहून अधिक काळ रस्ता रोको आंदोलन केले. जैन मुनी, स्वामीजींना संरक्षण देण्याची तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी आंदोलकांनी केली.
जैन धर्माचे ध्वज हाती घेऊन आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत, जैन मुनींच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध केला. या क्रूर कृत्यात सहभागी असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. या आंदोलनात सिद्धसेन महाराजांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार संजय पाटील, राजेंद्र जैन, अभय अवलक्की यांच्यासह श्वेतांबर व दिगंबर जैन समाजाच्या हजारो नागरिकांनी भाग घेतला. आंदोलनस्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
देशाच्या इतिहासातील पहिलीच हृदयद्रावक घटना कॅलिफोर्निया / नवी दिल्ली : जैन मुनी श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा आचार्य लोकेशजींसह समस्त जैन समाजाने तीव्र निषेध केला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर जैन आचार्य लोकेशजी यांनी कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींचा समावेश करून सखोल चौकशीची मागणी करणारे पत्र त्यांनी लिहिले आहे. त्यात आचार्य लोकेशजी यांनी म्हटले आहे की, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जैन मुनींच्या हत्येची पहिलीच दुःखद हृदयद्रावक घटना आहे. जैन मुनींची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूर व्यक्तीला योग्य ती शिक्षा मिळावी आणि संतांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. आचार्य लोकेशजी यांनी आपल्या मागणीसाठी अमेरिकेत उपोषण केले.