उत्तर प्रदेश सरकारकडून गुन्हेगारांना संरक्षण; प्रियांका गांधी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 01:14 AM2019-12-08T01:14:22+5:302019-12-08T01:14:54+5:30
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.
उन्नाव : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. उत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी
केला.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजप सरकारने असे वातावरण निर्माण केले आहे की, राज्यातील गुन्हेगारांना भीती राहिलेली नाही. भाजप सरकार असे म्हणत आहे की, उत्तर प्रदेशात गुन्हेगारांना थारा नाही. मला तर असे वाटते की, त्यांनी जे उत्तर प्रदेश बनविले आहे त्यात महिलांसाठी जागा नाही.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, पीडितेच्या कुटुंबियांनी मला सांगितले की, कशाप्रकारे गुन्हेगारांनी या कुटुंबियाला त्रास दिला. पीडित कुटुंबाच्या मुलीला धमकी दिली गेली की, मुलीचे नाव शाळेतून काढून टाकले जाईल. त्यामुळे तिने शाळेत जाण्याची हिंमत केली नाही. मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. जूनमध्ये शेतातील पीक जाळून टाकण्यात आले. या कुटुंबाला सातत्याने त्रास दिला गेला.
गुन्हेगारांना कुणाचाही धाक राहिलेला नाही
प्रियांका गांधी म्हणाल्या की, अशी चर्चा आहे की गावच्या प्रमुखाचे भाजपशी संबंध आहेत. या प्रकारामागील सत्य समोर आणण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. त्या म्हणाल्या की, अशा लोकांना संरक्षण दिले जाऊ शकते. असे प्रकार नेहमी होत आहेत.
च्हे प्रकरण राजकीय न करता प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे की, अशा घटना सातत्याने का होत आहेत? आज उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. एका टष्ट्वीटमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने पीडितेला सुरक्षा दिली नाही. गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली? असे अनेक सवाल त्यांनी केले.