मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे, पुण्यातील वकिलांनी शुक्रवारी अनोख्या पद्धतीने निषेध केला. न्यायालयाच्या आवारात चक्क सायकल वारी करत सर्व वकील दाखल झाले. सरकारला वाढत्या महागाईची चिंता नसल्याचे सांगत आपणच उपाय शोधण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे वकिलांनी यावेळी सांगितले. तर, दुसरीकडे बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही सायकलवरुन विधानभवन गाठलं आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलने शतक पूर्ण केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. या इंधन दरवाढीचा वेगवेगळ्या प्रकारातून निषेध करण्यात येत आहे. विरोधकांनीही यापूर्वी अनेकदा केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. कुठे चुलीवर स्वयंपाक करुन तर कुठे दुचाकी वाहनाला फाशी देऊन अनोख्या पद्धतीने हा निषेध नोंदविण्यात आला आहे. आता, बिहारमधील राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी विधानसभेच्या अधिवेशन कामकाजाला जाण्यासाठी चक्क सायकलवरुन सवारी केली. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे आज सायकल चालवून आपण विधानसभा सभागृहात जात आहोत. गरिबांची पिळवणूक करणाऱ्या आणि धनदांडग्यांप्रती प्रिय असलेल्या सरकारने पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढवून सर्वसामान्य नागरिकांना मरायला भाग पाडलंय.
पुणे शहरात वकिलांची सायकल सवारी
पुणे शहरात पॉवर आणि स्पीड पेट्रोलचे भाव शंभरीपार पोहोचले आहेत. तर साध्या पेट्रोलसाठी लिटरमागे जवळपास ९७ रुपये मोजावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या वकिलांनी अनोखा निषेध केला. या वकिलांनी आत चक्क सायकलवरुन न्यायालय गाठले. काळा कोट घालत या वकिलांनी सायकल स्वारी केली. पुण्यातले प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी यात पुढाकार घेतला होता.