बंगळुरु, दि. 6 - देशातील आघाडीच्या पत्रकारांपैकी एक असलेल्या गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ट्विटरवर #gaurilankeshmurder हॅशटॅग सुरु असून, युजर्स आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. फक्त सर्वसामान्यच नाही तर अनेक सेलिब्रेटींनीही हत्येचा निषेध करत प्रश्न उपस्थित केले आहेत. पुणे शहरातील विविध डाव्या संघटनांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध नोंदवला आहे. स. प. महाविद्यालयाच्या चौकात जमा होऊन लंकेश यांची हत्या व देशातील बदलत्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या म्हणजे देशात विरोधी विचारांना जिवंत राहूच द्यायचे नाही, असा हा विचार आहे. फक्त निषेध करण्यात अर्थ नाही. फँसिस्ट विचारांचे सरकार राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. धिरेश जैन सुनिती सु. र. सुभाष वारे वैशाली चांदणे आदी अनेक पुरोगामी विचारा़चे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या निषेध मोर्चात तरुणांचा लक्षणीय सहभाग होता. तसेच मोदी सरकार, संघविरोधी घोषणा देण्यात आल्या. अभिव्यक्ति स्वातंत्र्य जिन्दाबाद, संघ परिवार मुर्दाबाद, असंही आंदोलकांनी म्हटलं आहे.
रात्री आठ सव्वाआठच्या सुमारास तीन ते चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. हल्ला करणा-यांची ओळख अद्याप पटलेली नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी हत्येचा निषेध केला असून, लवकरात लवकर तपास व्हावा यासाठी पोलिसांच्या तीन टीम तयार करत असल्याची माहिती दिली आहे.
बंगळुरुचे पोलीस आयुक्त टी सुनील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही जेव्हा आलो तेव्हा गौरी लंकेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होता. घटनास्थळी आम्हाला चार रिकाम्या काडतूस सापडल्या आहेत. चारपैकी किती गोळ्या त्यांच्या शरिरात घुसल्या हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. मारेकरे नेमके किती होते हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शेजा-यांनी गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर घटनेची माहिती मिळाली. त्यांनी आमच्याकडे कोणतीही तक्रार केली नव्हती. जर त्यांना एखादी धमकी आली होती, किंवा त्यांनी तसं कोणला सांगितलं असेल तर त्याचा तपास केला जाईल'.
55 वर्षीय गौरी लंकेश या साप्ताहिक लंकेश पत्रिकाच्या संपादक होत्या. तसेच त्या विविध वर्तमानपत्रांमध्ये लिखाण करायच्या. त्यांनी उजव्या विचारसरणीच्या प्रवृत्तीवर सातत्याने टीका केली होती. 2016 रोजी अब्रुनुकसानी केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी अब्रुनुकसानीचा केल्याप्रकरणी त्यांच्यावर केस दाखल केली होती. 2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. नंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली.
मुंबई आणि पुण्यासह देशभरातील सहा शहरांमध्ये हत्येचा निषेध नोंदवण्यात आला
त्यांची माहिती खालीलप्रमाणे - मुंबई - संध्याकाळी 6 वाजता, कार्टर रोडपुणे - दुपारी 4 वाजता, एसपी कॉलेजसमोर, सदाशिव पेठ, टिळक रोडअहमदाबाद - संध्याकाळी 4 वाजता, लाल दरवाजा, सदरबागबंगळुरु - सकाळी 8.45 वाजता, नाईक भवनधारवाड - सकाळी 10 वाजता, कुलबर्गी यांच्या निवासस्थानीदिल्ली - सकाळी 11 वाजता, प्रेस क्लबहैदराबाद - दुपारी 4 वाजता, सुंदेरय्या विगनना केंद्रममंगलोर - दुपारी 4 वाजता, टाऊन हॉल, गांधी पुतळ्याजवळ