ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. 27 - भटक्या कुत्र्यांमुळे होणा-या त्रासाला कंटाळून काँग्रेस यूथ फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर कुत्र्यांची हत्या केल्यानंतर त्यांनी एका बांबूला कुत्र्यांना बांधून शहरात मोर्चादेखील काढला. कोट्टयम शहरात ही घटना घडली आहे. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचे वाढलेले हल्ले आणि महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांच्या भुमिकेचा निषेध दर्शवण्यासाठी हे विकृत कृत्य करण्यात आले.
आंदोलक कार्यकर्त्यांनी मृत कुत्र्यांना पोस्ट ऑफिसपर्यंत नेलं. तिथे पोहोचल्यावर हे मृतदेह पार्सल करुन मनेका गांधींना पाठवण्याची मागणी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी टोकन म्हणून मृतदेह पोस्ट ऑफिसबाहेर ठेवले आणि त्या ठिकाणी मनेका गांधींचा पत्ता लिहून ठेवला.
'भटक्या कुत्र्यांमुळे लोकांना धोका असतानाही मनेका गांधी यांनी घेतलेली भुमिका संशयास्पद आहे,' असं युथ फ्रंटचे अध्यक्ष साजी मंजकडंबील यांनी सांगितलं आहे.
'कुत्र्यांबद्द्ल आम्हाला द्वेष नाही. आमचा निषेध धोकादायक कुत्र्यांविरोधात होता. आमचा निषेध पाहून जिल्हाभरातील लोक अशीच भुमिका घेतील अशी अशा आहे,' असंही साजी मंजकडंबील बोलले आहेत. धोकादायक कुत्र्यांना कसं काय ओळखलं ? असा प्रश्न विचारला असता पाहून लक्षात येतं असा अजब दावाही त्यांनी केला.
कोट्टयम पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. '15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अद्याप कोणाला अटक करण्यात आलेलं नाही,' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.