नवी दिल्ली : तीन कृषी कायदे रद्द करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मधाळ भाषा वापरली आहे. या आंदोलनात ७५० जण मरण पावले, आंदोलकांवर १० हजार खटले भरण्यात आले आहेत. ते रद्द होण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली नाही. पंतप्रधानांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले.
टिकैत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी इतकीही गोड भाषा वापरू नये की ज्यापुढे मधही फिका पडेल. टीव्हीवरून घोषणा करताना मोदींनी जी मधाळ भाषा वापरली तीच त्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी करतानादेखील कायम ठेवावी. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे का घेतले, याचे कारण आम्हाला माहिती नाही. मात्र काही राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका होत आहे. किमान हमी भावासाठी कायदा करा, ही आमची मागणी कायम आहे. त्यासाठीही यापुढेही शेतकरी संघर्ष करत राहणार आहेत.
शेतीमाल हा अर्ध्या किमतीत विकला जात आहे. त्यामुळेच किमान हमी भावाची हमी देणाऱ्या कायद्याची गरज आहे.
कायदे मागे घेतले तरी भाजपसोबत युती नाही -अकाली दलाने केले स्पष्ट केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले असले तरीही भाजपसोबत आघाडी करण्याची कोणतीही शक्यता नाही, असे अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी स्पष्ट केले आहे. बादल म्हणाले की, शेतकरी आंदोलनात ७०० शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला.
अमरिंदर सिंग भाजपसोबत जाणार ? - माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोबत आघाडी करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी मोदी यांची स्तुती केली. - त्यानंतर या नव्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष स्थापन केला आहे.