बिहारमधील बक्सर येथे केंद्रीय राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांना जनतेच्या संतापाचा सामना करावा लागला. यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. तसेच चौबै यांच्याविरोधात लोकांनी घोषणाबाजी केली. त्यांनी अश्विनी चौबे मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या. बक्सर-चौसा येथील बनारपूर येथे आलेल्या चौबे यांना सुरक्षारक्षकांनी जमावापासून सुरक्षितरीत्या बाहेर नेले.
केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे हे थर्मल पॉवर प्लँटमध्ये जाळपोळीनंतर शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बनारपूर गावात आले होते. त्यादरम्यान त्यांनी काही वेळ शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र येथे आलेला जमाव खूप संतप्त झाला. त्यानंतर त्यांनी चौबै यांच्या ताफ्यावर दगडफेक करत घोषणाबाजी केली.
बिहारमधील बक्सर येथे शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी आंदोलन करत आहेत. बक्सर येथील चौसा गावामध्ये सतलुज जलविद्युत निगमच्या थर्मल पॉवर प्लँटसाठी जमिनीचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. शेतकरी यासाठी योग्य मोबदला मागत आहेत. पोलिसांनी यापूर्वी मंगळवारी रात्री उशिरा शेतकऱ्यांच्या घरात घुसून आंदोलकांवर लाठीमार केला होता.
मंगळवारी रात्री घरांमध्ये घुसून पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेनंतर शेतकरी संतप्त झाले होते. त्यांनी वाहनांची जाळपोळ केली. चौसा पॉवर प्लँटमध्येही मोडतोड करण्यात आली. शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत रात्रभर आंदोलन केले होते.