पटियाला : पंजाबमधील पटियाला येथे भाजपाच्या उमेदवार परनीत कौर यांच्या विरोधात आंदोलन करताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर भाजपा उमेदवार परनीत कौर यांनी रविवारपर्यंत आपला निवडणूक प्रचार कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिहरा गावात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान ६० वर्षीय शेतकरी सुरिंदर पाल सिंह जमिनीवर कोसळले होते. मात्र, पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने सुरिंदर पाल सिंग जमिनीवर पडल्याचा आरोप इतर आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.
दुसरीकडे, भाजपा उमेदवार परनीत कौर यांच्या टीमनेही एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान जमिनीवर पडताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी परनीत कौर यांच्याविरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने करत त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस शेतकऱ्यांना गाडी अडवू नका, अशी विनंती करत होते.
या घटनेनंतर सुरिंदर पाल सिंग यांना राजपुरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते सर्वन सिंह पंढेर यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपा उमेदवार आणि नेत्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.
भाजपाच्या उमेदवार परनीत कौर यांनी शेतकऱ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. शेतकरी सुरिंदर पाल सिंह यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे, असे परनीत कौर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. तसेच, शेवटच्या श्वासापर्यंत मी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहीन, असे आश्वासन सुद्धा परनीत कौर यांनी दिले आहे.
याचबरोबर, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरी देण्याची मागणी शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी केली आहे. यासोबतच याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जोपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याचे शेतकरी नेत्याने सांगितले.