उमेश जाधव/सुमेध बनसोड ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना, रविवारी देशाच्या राजधानीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दक्षिण दिल्लीच्या न्यू फ्रेंड््स कॉलनी भागात आंदोलकांनी दिल्ली परिवहन महामंडळाच्या चार बस व पोलिसांची सहा वाहने जाळली. तो आगडोंब विझविताना अग्निशमन दलाचे तीन जवान व सहा पोलीस जमावाच्या दगडफेकीत जखमी झाले. या हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि दक्षिण दिल्लीच्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये घबराट पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात निमलष्करी दलांचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या हिंसाचाराचा निषेध केला व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.अनेक ठिकाणी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाल्यावर सौम्य लाठीमारही करण्यात आला. पोलिसांनी जामिया मिलिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिरून अश्रुधुराची नळकांडी फोडली. काही विद्यार्थ्यांना लाठीमार करत कॅम्पसच्या बाहेर ओढून आणण्यात आले. हात वर केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पोलीस हॉस्टेल व ग्रंथालयातून बाहेर घेऊन येताना दिसले. पोलिसांनी विनापरवाना कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना बळजबरीने बाहेर काढले, असा आरोप विद्यापीठाचे चीफ प्रॉक्टर वासीम अहमद खान यांनी केला.
मूळच्या नागरिकत्व कायद्यातील दुरुस्त्या मंजूर झाल्यानंतर लगेचच जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू केले होते. ते लक्षात घेऊन विद्यापीठाने सर्व परीक्षा रद्द करून ५ जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली. या आंदोलनाचा रविवारी सहावा दिवस होता. शेकडो विद्यार्थी, तरुण, विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे प्रतिनिधी रविवारी जामियाजवळ जमले होते. सायंकाळी चार वाजता हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. त्यांच्यासमोर एका राजकीय नेत्याचे भाषण झाले. जमावाचा त्यामुळेच भडका उडाला व बसेसची जाळपोळ सुरू झाली.
जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या संघटनांनी या हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा काही संबंध नाही. कॅम्पसबाहेरचे हे आंदोलन व हिंसाचार स्थानिक लोकांनी केले व बदनाम करण्यासाठी त्याचे खापर आमच्यावर फोडले, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव सैमन फारुकी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, आंदोलक मथुरा रोडवर शांततापूर्ण आंदोलन करत होते. आंदोलक-पोलिसांमध्ये वाद झाला. तणावात त्यामुळे वाढ झाली. पोलिसांनी लाठीमार सुरू केला. संतप्त जमावाने त्यामुळे बसेस जाळल्या.या आंदोलन व हिंसाचारामुळे दिल्ली मेट्रोची जामिया, सुखदेव विहार, जसोला, शाहीन बाग व आश्रम रोडसह तेरा स्थानके संध्याकाळनंतर बंद करण्यात आली व गाड्यांचे तेथील थांबेही रद्द करण्यात आले. अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली.हिंसेमागे काँग्रेसचा हात - मोदीनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात ईशान्य भारतात सुरू असलेले हिंसक आंदोलन पेटविण्यामागे काँग्रेसचा हात आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला आहे.विधेयकात सुधारणा करू- शहानागरिकत्व दुरुस्ती कायद्यात आवश्यकता असल्यास आणखी काही सुधारणा करण्यात येतील. मेघालयाच्या प्रश्नांवर नक्की तोडगा काढू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.