ठाणे, दि. 6 - दीन दलितांसाठी कार्यरत असलेल्या लंकेश साप्ताहिकाच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश, यांची मंगळवारी बंगळूर येथील राहत्या घरी हत्या झाली, त्याचे पडसात ठाण्यात उमटले. या हत्येच्या निषेधार्थ ठाणे येथील सर्व सामाजिक संघटनां, विचारवंत, कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी एकत्र येउन बैठक घेतली. त्यात आज सायंकाळी ठाणे रेल्वे स्टेशनजवळ मूक निदर्शने करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला.
श्रमिक जनता संघ, अंद्धश्रधा निर्मुलन समिती व स्वराज इंडिया याच्या पुढाकाराने ही निदर्शने होणार आहेत. सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांची राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि एम.एम. कलबुर्गी यांच्या प्रमाणे गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आल्याचे स्वराज इंडियाचे सचिव उन्मेश बागवे यांनी सांगितले. देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
देशात उजव्या विचारांच्या राजकारणाच्या विरोधात बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरू असून त्या मालिकेत ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची मंगळवारी बंगळुरू येथे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीचा मृत्यू झाला. दरम्यान, गौरी यांच्यावर हल्ला करणारे कोण होते आणि कोणत्या कारणासाठी त्यांची हत्या करण्यात आली. ज्या पद्धतीने उजव्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या विचारवंतांची हत्या करण्यात आली. त्याच पद्धतीने हे हत्याकांड घडल्याचे बागवे यांनी सांगितले.
विचारांचा लढा विचारांनीच व्हायला हवा, बंदुकीच्या गोळीने नाही कारण गोळीने माणूस मारतो पण विचार मारला जात नाही या विचारावर ठाम विश्वास असलेले ठाण्यातील कार्यकर्ते व सामान्य नागरिक या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी आज संध्याकाळी 5 ते 7 या वेळात ठाणे स्टेशन बाहेर ब्रिजखली पोलिस चौकीजवळ मुक निदर्शने करणार आहेत