कोलकाता : पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणारा धार्मिक छळ नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर (सीएए) माजलेल्या वादंगामुळे प्रकर्षाने जगासमोर आला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे म्हटले आहे.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने कोलकात्यातील बेलूर मठामध्ये आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नव्हे तर ते देण्यासाठी बनविण्यात आला आहे. या कायद्याने कोणालाही एका रात्रीत भारतीय नागरिकत्व मिळणार नाही हे युवकांना मी सांगू इच्छितो. धार्मिक छळामुळे परागंदा व्हावे लागलेल्यांना भारतीय नागरिकत्व द्यावे, असा विचार महात्मा गांधी यांनी मांडला होता. आम्ही फक्त त्या विचाराची अंमलबजावणी करीत आहोत.
ते म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे ईशान्य भारतातील रहिवाशांची ओळख व संस्कृतीचे अस्तित्व नष्ट होणार नाही. या कायद्यातील तरतुदी अत्यंत स्पष्ट असतानाही काही जण त्याबाबत केवळ राजकीय स्वार्थासाठी युवकांची दिशाभूल करीत आहेत. गेली ७० वर्षे अल्पसंख्याकांवर अत्याचार केल्याबद्दल पाकिस्तानला जगाला उत्तर देणे या कायद्यामुळे भाग पडणार आहे. पाकिस्तानात मानवी हक्क पायदळी तुडविले गेले आहेत. या गोष्टी भारतीय युवकांनी समजून घेतल्या पाहिजेत. पाच वर्षांपूर्वीपेक्षा देशातील सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे. भारतीय युवकांकडून आता साऱ्या जगाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेलूर मठामध्ये जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. मोदी यांनी शनिवारी रात्री बेलूरच्या मठातच वास्तव्य केले होते. तसे करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास रामकृष्ण मिशनचा नकार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बेलूर मठातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास रामकृष्ण मिशनने नकार दिला. आमची अराजकीय संस्था असून तात्कालिक गोष्टींबाबत आम्ही काहीही बोलू इच्छित नाही, असे रामकृष्ण मिशनचे सरचिटणीस स्वामी सुविरानंद यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.कायदा रद्द करणार नाही : नक्वी
नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्र सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अतिशय ठाम आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. संसदेने संमत केलेल्या या कायद्यामध्ये बदल करण्यात येणार नाही हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले. डावे, काँग्रेसने केली निदर्शनेमोदींच्या कोलकाता दौºयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सलग दुसºया दिवशीही कोलकाता व पश्चिम बंगालच्या अन्य भागांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने सुरूच ठेवली होती. मोदी परत जा, भाजपचा निषेध असो, अशा घोषणा देत निदर्शकांनी कोलकात्यातील एस्प्लनेड परिसर शनिवारी रात्री व रविवारी सकाळीही दणाणून सोडला होता. पंतप्रधान मोदींना ते कोलकात्यात दाखल होताच निदर्शकांनी काळे झेंडेही दाखविले होते.
२५ हिंदू कुटुंबांचे भाजप आमदार पुनर्वसन करणारपाकिस्तानातून धार्मिक छळामुळे भारतात आश्रयाला आलेल्यांपैकी २५ हिंदू कुटुंबांचे मुजफ्फरनगर येथील कवाल गावात पुनर्वसन करण्याची घोषणा खटौली येथील भाजप आमदार विक्रम सैनी यांनी केली.