पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मंत्रिमंडळ निवडताना दिलेल्या काही धक्क्यांपैकी एक आश्चर्याचा धक्का म्हणजे, माजी परराष्ट्र सचिव डॉ. एस. जयशंकर यांना देण्यात आलेलं परराष्ट्र मंत्रिपद. 'मोदी सरकार-१' मध्ये हे मंत्रालय सुषमा स्वराज यांच्याकडे होतं आणि त्यांनी आपल्या कार्यकुशलतेनं त्यावर आपली छाप सोडली आहे. गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या आणि पाकिस्तानला खडे बोल सुनावणाऱ्या नेत्या अशी स्वराज यांची प्रतिमा आहे. त्यांची ही लोकप्रियता ओळखून, जयशंकर यांनी पदाची सूत्रं स्वीकारताच त्यांच्याबद्दल विनम्र भावना व्यक्त केल्यात.
'माझं पहिलं ट्विट. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभार. ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आल्यानं सन्मानित झाल्यासारखं वाटतंय. सुषमा स्वराज यांच्या पाऊलखुणांवरून चालणं खूप अभिमानास्पद आहे', असं एस जयशंकर यांनी म्हटलंय.
वास्तविक, मोदी सरकार-२ मध्येही परराष्ट्र खातं सुषमा स्वराज यांनाच दिलं जाईल, असा बहुतेकांचा कयास होता. प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवणार नसल्याचं स्वराज यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. परंतु, त्यांना राज्यसभा सदस्यत्व देऊन मंत्री केलं जाईल, असं वाटत होतं. परंतु, शपथविधीच्या दिवशी सुषमा स्वराज स्टेजसमोर बसल्या आणि अनेकांचा हिरमोड झाला. सोशल मीडियावरून नाराजीही व्यक्त झाली. परंतु आता, स्वराज यांच्या चाहत्यांची मनं एस. जयशंकर यांनी जिंकली आहेत.
एस. जयशंकर यांना परराष्ट्र व्यवहारातील प्रत्यक्ष डावपेचांची चांगली माहिती आहे. रशिया, वॉशिंग्टन, बिजींग अशा सध्याच्या जगातील महत्वाच्या शक्तीकेंद्रांवर त्यांनी काम केले आहे. अन्य अनेक देशांतील त्यांची कामगिरी वाखाणली गेली आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून जयशंकर यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. अमेरिकेने मोदींचा व्हिसा रद्द केला. पंतप्रधान झाल्यावर मोदींना तो पुन्हा मिळाला. मोदींचा पहिला अमेरिकन दौरा बराच गाजला. तो यशस्वी करण्यात जयशंकर यांचा वाटा महत्त्वाचा होता. भारताच्या अणुकार्यक्रमातही त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. अनेक राष्ट्रप्रमुखांशी त्यांचा थेट संबंध आहे. हे गुण हेरूनच मोदींनी परराष्ट्र मंत्री म्हणून एस. जयशंकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. जयशंकर यांचे वडील सुब्रमण्यम हे नावाजलेले सामरिक सल्लागार होते.