Bhagavad Gita Natyashastra included in UNESCO Memory of the World Register: आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला व्यापक अर्थाने जागतिक मान्यता मिळाली आहे. श्रीमद् भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र या दोन्हीला आता युनेस्कोच्या 'मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर'मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. भारताच्या संस्कृतीच्या वारशासाठी हे ऐतिहासिक क्षण आहेत. युनेस्कोच्या 'मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर'मध्ये जगातील महत्त्वाच्या कलाकृतींची कागदोपत्री वारसास्थळांसह यादी असते. आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीच्या शिफारसीनुसार आणि कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने यातील कलाकृतींची निवड केली जाते. या यादीत श्रीमद् भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा समावेश झाल्याने भारताचे जागतिक महत्त्व आणि शाश्वत वैश्विक मूल्य सार्वजनिकरित्या मान्य झाले आहे.
मे २०२३ पर्यंत 'मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर'मध्ये एकूण ४९४ दस्तऐवजीकरण केलेल्या वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला होता. आता या दोन कलाकृतींच्या समावेशामुळे आतापर्यंत भारतातील एकूण १४ नोंदी या रजिस्टरमध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनीही याबाबत सर्व देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. "जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण! युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश होणे ही आपल्या कालातीत ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीची जागतिक ओळख आहे. गीता आणि नाट्यशास्त्राने शतकानुशतके संस्कृती आणि चेतना जोपासली आहे. त्यांतील दूरदृष्टी असलेले विचार जगाला कायम प्रेरणा देत राहतील," असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले.
भारताचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या दोन्ही कलाकृतींच्या समावेशाची माहिती दिली. 'केवळ साहित्यिक वारसाच नाही तर भारताच्या सौंदर्यशास्त्र आणि तत्वज्ञानाचा आधारस्तंभ' असे त्यांनी या दोन कलाकृतींचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, "हे दोन्ही ग्रंथ आपल्या विचार करण्याच्या, अनुभवण्याच्या, जगण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीला आकार देणारे आधारस्तंभ आहेत. या रजिस्टरमध्ये आता भारताच्या एकूण १४ नोंदी आहेत. हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत ज्ञानाचा आणि कलात्मक तेजाचा उत्सव आहे."