Vikram S Rocket Launch: भारतातील Skyroot Aerospace ने तयार केलेले देशाचे पहिले खाजगी रॉकेट विक्रम-एसचे शुक्रवारी (१८ नोव्हेंबर २०२२) यशस्वी प्रक्षेपण केले. हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) यांच्या नावावर ठेवले आहे. कंपनीचे विक्रम-एस रॉकेट सकाळी ११.३० वाजता श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) लाँचपॅडवरून प्रक्षेपित करण्यात आले.
Skyroot Aerospace ने दोन वर्षांत विक्रम-एस रॉकेट विकसित केले. कंपनीसाठी हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण होते. कारण ते पुढील वर्षी लॉन्च होणार्या विक्रम-1 ऑर्बिटल वाहनामध्ये वापरल्या जाणार्या ८० टक्के तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करण्यात मदत करणार आहे. विक्रम-एस चे प्रक्षेपण सब-ऑर्बिटल असेल, म्हणजेच वाहन ऑर्बिटल वेगापेक्षा कमी वेगाने प्रवास करेल. त्यामागचा उद्देश म्हणजे अंतराळयान जेव्हा अंतराळात पोहोचेल, तेव्हा ते पृथ्वीभोवतीच्या कक्षेत राहणार नाही. फ्लाइटला पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल. तर, विक्रम-1 हे मोठे वाहन असेल, जे कक्षेत उड्डाण करेल.
स्कायरूट कंपनी २०१८ मध्ये सुरू झाली. 'स्कायरूट'ने रॉकेटच्या या विक्रम मालिकेचे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावर ठेवले आहे. ही रॉकेट्स कार्बन कंपोझिट वापरून तयार करण्यात आलेल्या जगातील काही प्रक्षेपण वाहनांपैकी आहेत. वाहनातील कंपनांच्या स्थिरतेसाठी वापरण्यात येणारे थ्रस्टर्स थ्रीडी प्रिंट केलेले आहेत. त्याचबरोबर लॉन्च व्हेईकलमध्ये वापरण्यात आलेल्या इंजिनला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून 'कलाम-80' असे नाव देण्यात आले आहे.
स्कायरूट कंपनीने सांगितले की, या प्रक्षेपणामुळे भारतीय अंतराळ क्षेत्रातील पहिली खाजगी रॉकेट उत्पादक बनण्याचा आम्हाला अभिमान आहे. त्याचबरोबर लॉन्च व्हेईकलमध्ये वापरण्यात आलेल्या इंजिनला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून 'कलाम-80' असे नाव देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.