पुणे : अवघ्या जगाचे लक्ष कोरोनावरील लसची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटकडे लागलेले आहे. मात्र याच दरम्यान सिरमसह सर्व भारतीयांना भूषणावह अशी एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना 'एशियन ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर केला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मोलाचा वाटा उचलल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
जगातील सर्वात मोठी लस उत्पादनाची क्षमता सीरमकडे आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील 'कोविशिल्ड' लसीचं उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत दिली होती. भारतात सध्या कोविशिल्ड या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.
सिंगापूर येथील ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ या वर्तमानपत्राकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी आशियातील सहा व्यक्तींची निवड झाली आहे.त्यात आदर पुनावाला यांच्यासह चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा आणि चीनचे संशोधक झँग योंगझेन, सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग, दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
कोरोना संकटकाळात 'एशियन ऑफ द इयर' पुरस्कारातील व्यक्तींनी संशोधन , निर्मिती, वितरण, यांसारख्या विविध पातळ्यांवर महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. आदर पुनावाला यांनी कोव्हीशिल्ड लसची निर्मिती, तसेच चीनचे संशोधक असलेले झँग यांनी Sars-CoV-2 विषाणूचा जिनोम सर्वात पहिल्यांदा शोधून काढत ऑनलाइन माहिती प्रसिद्ध केली होती. दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस वितरण करणार आहे. या निवड झालेल्या सर्व व्यक्तीना ‘व्हायरस बस्टर्स’ म्हणून संबोधले आहे.
पुरस्कार जाहीर करताना ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ ने म्हटले आहे की, कोरोना या महामारीने अनेकांचा जीव घेतला आहे. परंतु, प्रचंड लोकसंख्या असलेल्या आशिया खंडातील या ‘व्हायरस बस्टर्स’नी या आव्हानात्मक काळात देखील उत्तम काम करत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या धैर्याला व सर्जनशीलतेला आम्ही सलाम करतो. जगातील जनजीवन पूर्णपणे थांबले असताना पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आशेचा किरण असल्याचे दाखवून दिले.
.......................................
सिरम इन्टिट्युटकडून कोविशिल्ड लसीच्या वितरणासाठी सुरूवातीला भारतालाच प्राधान्य.. सिरम इन्टिट्युटकडून कोविशिल्ड लसीच्या वितरणासाठी सुरूवातीला भारतालाच प्राधान्य प्राधान्य दिले जाईल असे सिरम इन्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी आधीच जाहीर केले. भारतातील वितरणाबाबत अद्याप केंद्र सरकारशी कोणताही लिखित करार झालेला नसला तरी जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस लागणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने यापुर्वीच स्पष्ट केले आहे. जानेवारीपासून दर महिन्याला १० कोटी डोसचे उत्पादन केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पट केले.