नवी दिल्ली: संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन संसदेत खोटं बोलल्याचा आरोप काँग्रेसनं केला. हिंदुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेडला एक लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स दिल्याची खोटी माहिती सीतारामन यांनी दिली, असा दावा काँग्रेसनं केला. उद्या संसदेत येताना याबद्दलची कागदपत्रं घेऊन या. अन्यथा राजीनामा द्या, असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीतारामन यांना दिलं आहे. त्यामुळे उद्या संसदेत राफेल डीलचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेडला एक लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स दिल्याचा आदेश दिल्याची माहिती सीतारामन यांनी राफेल डीलबद्दल बोलताना दिली. मात्र ही माहिती पूर्णपणे खोटी आहे. आपल्याला एक पैसादेखील मिळाला नसल्याचं हिंदुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेडनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सीतारामन यांनी याबद्दलचे पुरावे संसदेत सादर करावेत, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. 'जेव्हा तुम्ही एकदा खोटं बोलता. तेव्हा ते खोटं लपवण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा खोटं बोलावं लागतं. राफेल डीलवरुन पंतप्रधानांचा बचाव करण्याच्या प्रयत्नात संरक्षणमंत्री खोटं बोलल्या. त्यामुळे उद्या संरक्षणमंत्र्यांनी संसदेत एचएएलच्या 1 लाख कोटी रुपयांसंदर्भातील सरकारी आदेश आणावेत. अन्यथा राजीनामा द्या,' असं आव्हान राहुल यांनी ट्विट करुन दिलं आहे.
उद्या संसदेत पुरावे आणा अन्यथा राजीनामा द्या; राहुल गांधींचं संरक्षणमंत्र्यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 6:15 PM