नवी दिल्ली : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) राजीव कुमार यांना पत्र लिहून मतदान केल्यावर ते नेमके कोणाला झाले याची पावती देणाऱ्या यंत्राविषयी (व्हीव्हीपॅट) मत मांडण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या सदस्यांना संधी द्यावी, अशी मागणी केली.
कुमार यांना २० डिसेंबर २०२३ रोजी लिहिलेल्या पत्रात जयराम रमेश यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी एका बैठकीत पारित केलेल्या ठरावाच्या आधारे व्हीव्हीपॅट वापरण्याबाबत चर्चा करण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी ईसीआयला भेटीची वेळ देण्याची विनंती केली आहे. “आम्ही या ठरावाची प्रत देण्यासाठी ईसीआयला भेटण्याचा आणि चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत.” असे ते म्हणाले.
३० डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्रात जयराम रमेश यांनी निदर्शनास आणून दिले की, ९ ऑगस्ट २०२३ रोजी इंडिया आघाडीच्या ईव्हीएम संबंधित चिंतेवर ईसीआयला एक निवेदन सादर करण्यात आले होते. गेल्या वर्षी ९, १०, १६, १८ आणि २३ ऑगस्ट रोजी ईसीआयसोबत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाच्या बैठकीसाठी निवेदनाद्वारे अनेक वेळा विनंती करण्यात आली होती, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.