श्रीनगर - काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित असलेल्या एका सरपंचाची हत्या केल्याने खळबळ उडाली असून, काश्मीर खोऱ्यात उरलेल्या मोजक्या काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी काश्मीर खोऱ्यातील हिंदूंना सुरक्षेसाठी शस्रास्रे पुरववण्याचा सल्ला दिला आहे.
व्हिलेज डिफेन्स कमिटी फॉर्म्युला नियोजनासह लागू केल्याने काही नुकसान होणार नाही. जम्मूमधील चिनाब खोऱ्यात हिंदूंना सुरक्षेसाठी शस्रे देण्यात आली होती. त्यामुळे नव्वदच्या दशकात या भागातून होणारे हिंदूंचे पलायन रोखण्यासाठी मदत मिळाली होती, असे त्यांनी सांगितले.
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी दुर्बल मुस्लिमांनासुद्धा शस्रास्रे दिली गेली पाहिजेत. जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे पहिली व्हिलेज डिफेन्स कमिटी स्थापन करणारी मी पहिली व्यक्ती होतो. इस्राइलप्रमाणे काश्मीर खोऱ्यात दुर्बल लोकांसाठी विशेष तरतुदी करण्याची गरज आहे, असे जम्मू काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी पुढे सांगितले.
काश्मीर खोऱ्यात व्हिलेज डिफेन्स कमिटी स्थापन करणे हे कठीण काम आहे. पण ती अशक्य बाब नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी सरपंच अजय पंडिता यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर एस. पी. वैद्य यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आले आहे.
दहशतवाद्यांनी सोमवारी संध्याकाळी अजय पंडिता यांची हत्या केली होती. या हत्येची जबाबदारी लष्कर ए तोयबाशी निगडित असलेल्या द रेजिस्टेंस फ्रंटने घेतली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या