सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- खासगी क्षेत्रातील नोकरदारांना यापुढे भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड)ची रक्कम निवृत्तीच्या दिवशी वा त्याआधीच दिली जाईल. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झालेल्या पुनर्विलोकन बैठकीनंतर, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ने आवश्यक उपाययोजनेची कार्यवाही सुरू केली असून त्याचा लाभ देशातल्या ४ लाख कोटी नोकरदारांना होणार आहे.केंद्रीय भविष्य निधीचे आयुक्त डॉ. व्ही.पी. जॉय यांनी सर्व कार्यालयांना पत्रक पाठवले आहे. खासगी कंपन्यांमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी ३ महिने अगोदरच तयार करावी, सर्वांना निवृत्तीच्या दिवशी अथवा जमल्यास त्यापूर्वी प्रॉव्हिडंड फंडाची सारी रक्कम द्यावी, कंपनीच्या संचालकांनी प्रॉव्हिडंड फंडात त्यासाठी कंपनीच्या वाट्याची पूर्ण वर्गणी महिनाभर आधीच जमा करावी आणि त्याची पूर्वकल्पना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली द्यावी, असे त्यात म्हटले आहे. पीएफ व पेन्शनचे क्लेमफॉर्मही प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या महिनाभर आधीच मिळाले पाहिजेत, असा उल्लेख त्यात आहे.