CAAमध्ये नागरिकत्व हिरावण्याची तरतूद? सिद्ध करून दाखवा; अमित शाहांचे राहुल गांधींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 04:23 PM2019-12-27T16:23:52+5:302019-12-27T16:27:55+5:30
म्हणून देशात लागून केला नागरिकत्व दुरुस्ती कायदा...
सिमला - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशातील राजकारण तापलेले आहे. दरम्यान, यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे अल्पसंख्याकांचे नागरिकत्व काढून घेतले जाणार अशी अफवा काँग्रेस आणि कंपनी पसरवत आहे. मात्र राहुल गांधीजी मी तुम्हाला आव्हान देतो की या कायद्यात कुठेही कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद आहे का? हे सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हान अमित शाह यांनी दिले आहे.
राहुल गांधींवर घाणाघाती टीका करताना अमित शाह म्हणाले की, ''मी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, सर्वप्रथम नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समजून घ्या आणि नंतर इतरांनाही समजावून सांगा. नाहीतर खोटारडेपणा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे राजकीय पक्ष आपल्या व्होटबँकेच्या राजकारणासाठी आपल्याला एकमेकांविरोधात असेच लढवत राहतील.''
Home Minister Amit Shah in Shimla: Congress and company are spreading rumours that this act will take away citizenship of minorities, Muslims.I challenge Rahul baba to show even one clause in the act that has provision to take away citizenship of anyone. #CitizenshipAmendmentActpic.twitter.com/WaCStNuvQR
— ANI (@ANI) December 27, 2019
यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायदा का लागू केला याचेही कारण अमित शाह यांनी सांगितले. 1950 मध्ये नेहरू आणि लियाकत यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्याकांचे रक्षण करतील, मात्र लाखो-कोट्यवधी निर्वासितांची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळेच हा कायदा आणावा लागला आहे, असे शाह यांनी सांगितले. तसेच जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्याने आता काश्मीरमध्ये तिरंगा डौलाने फडकत आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करताना हा कायदा असंवैधानिक असून, एनआरसी आणि एपीआर हे गरीब नागरिकांवर कर आकारण्यासारखे आहेत, असा टोला लगावला आहे.