प्रियंका गांधी यांच्याविरोधात वाराणसी कोर्टात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:28 PM2019-04-02T15:28:44+5:302019-04-02T15:44:06+5:30
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन घेतलेले दर्शन गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे.
वाराणसी - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन घेतलेले दर्शन गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. प्रियंका गांधी यांच्या विरोधात वाराणसी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रियंका गांधी या ख्रिश्चन असल्याने त्या काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकत नाहीत असं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
प्रियंका गांधी यांनी वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात 20 मार्च रोजी पूजा केली होती. त्यानंतर कमलेश चंद्र त्रिपाठी या वकिलाने सोमवारी (1 एप्रिल) याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, प्रियंका यांची ख्रिश्चन धर्मावर श्रद्धा आहे. त्यामुळे त्या काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा करू शकत नाहीत. यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच प्रियंका गांधी या मांसाहारी आहेत असं ही त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.
त्रिपाठी यांनी प्रियंका यांच्यासह मंदिराचे पुजारी राजन तिवारी यांच्याविरोधातही याचिका दाखल केली आहे. तिवारी यांनी प्रियंका यांना पूजा करण्यासाठी मदत केली असल्याचं त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने मान्य केली असून यापुढील सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे. प्रियांका गांधी यांच्याविरोधात आयपीसी कलम 419, 295, 295ए आणि 171 एच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'पंतप्रधान मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते'
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2015 मध्ये बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली होती. काँग्रेस जिंकल्यास पाकिस्तानात टाळ्या वाजवल्या जातील असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे असं विचारलं असता हा त्यांचा दृष्टीकोन आहे असं त्यांनी सांगितलं होतं. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकिस्तानचा दौरा करत तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. या भेटीचा संदर्भ देत प्रियंका गांधी यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते' असं म्हटलं होतं.
वाराणसीत नरेंद्र मोदींना आव्हान देणार, प्रियंका गांधींनी दिले संकेत
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी येथून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत देताना वाराणसी येथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे यावेळी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियंका गांधी अशी थेट लढाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी या रायबरेलीच्या दौऱ्यावर होत्या. तेव्हा स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. त्यावेळी मी वाराणसी येथून निवडणूक लढवू का? असा प्रतिप्रश्न प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना केला. प्रियंकांच्या या प्रश्नाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. तुम्ही वाराणसी येथून लढा, त्यामुळे पूर्वांचलमध्ये पक्षाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वातावरणनिर्मिती होईल, असे सांगत कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली होती.