नवी दिल्ली- मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपा पुन्हा सत्ता संपादन करण्याची चिन्हे आहेत. परंतु राजस्थानमध्ये भाजपाला जोरदार झटका बसू शकतो. राजस्थानमध्ये काँग्रेस बहुमत मिळवणार असल्याचं इंडिया टुडे पॉलिटिकल स्टॉक एक्सचेंजनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तर दक्षिणेकडचं राज्य असलेल्या तेलंगणामध्ये पुन्हा एकदा के. चंद्रशेखर राव(केसीआर) पुन्हा सत्ता हस्तगत करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.इंडिया टुडे पॉलिटिकल स्टॉक एक्सचेंज(PSE)नं सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपाला विजय मिळण्याची 52 टक्के शक्यता आहे. तर राजस्थामध्ये भाजपाला विजयासाठी फक्त 35 टक्के देण्यात आले आहेत. काँग्रेस या दोन राज्यांमध्ये चांगला विजय मिळवण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये रमन सिंह यांच्या नेतृत्वात भाजपा विजय मिळवण्याची शक्यता असून, त्यांना 55 टक्के जनतेचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. तर तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे.PSEच्या मते, केसीआर यांचा पक्ष जिंकण्याची 75 टक्के शक्यता आहे. इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार, मध्य प्रदेशमध्ये 42 टक्के लोकांना भाजपाला पुन्हा सत्ता संपादन करण्यास पसंती दर्शवली आहे. तर सर्व्हेनुसार 40 टक्के लोकांनी सरकार बदलण्याची गरज असल्याचं मत मांडलं आहे. तर 18 टक्के लोकांनीही कोणतंही मत नोंदवलेलं नाही. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाला 52 टक्के विजयाची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत.मध्य प्रदेशात बीएसपीला फक्त 6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर काँग्रेसनं ज्योतिर्रादित्य शिंदेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित केल्यास काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो, असंही सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तर राजस्थानमध्येही भाजपाला पछाडत काँग्रेस सत्ता हस्तगत करण्याचा अंदाज या सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे. वसुंधरा राजेंच्या नेतृत्वातील भाजपा सराकरला 39 टक्के मतं मिळाली आहेत. तर राजस्थानात सत्तांतरण होण्यासाठी 43 टक्के लोकांनी मतदान केलं आहे. 18 टक्के मतदारांनी कोणतंही मत नोंदवलेलं नाही. राजस्थानात दलित आणि मुस्लिमांमध्ये भाजपाबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे यंदा भाजपाच्या हातातून राजस्थानमध्ये सत्ता जाण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर, राजस्थानात काँग्रेस, तर तेलंगणात केसीआर- सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 8:14 PM