चेन्नई - तामिळनाडूची (Tamil Nadu) राजधानी चेन्नई येथील एका महिला पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला होता. या महिला पोलिसाने मुसळधार पावसात येथील टीपी छत्रम भागातील स्मशानभूमीत बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका व्यक्तीला आपल्या खांद्यावर टाकून रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. महिला अधिकाऱ्याची ती संवेदनशीलता पाहून नेटीझन्सने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला, विशेष म्हणजे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे कौतुक केले होते. मात्र, दुर्दैवाने त्या युवकाने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
पोलीस निरीक्षक (Police Inspector) राजेश्वरी यांचा व्हिडिओ ट्विट व्हायरल झाला होता. राजेश्वरी एका बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या या व्यक्तीला आधी गाडीत बसवण्याचा प्रयत्न करतात, पण काही कारणास्तव ते शक्य होत नाही. त्यानंतर त्या या बेशुद्ध व्यक्तीला ऑटोमध्ये झोपवतात आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत उपचारासाठी रुग्णालयात पाठवतात. राजेश्वरी यांनी शर्थीचे प्रयत्न करुन युवकाला रुग्णालयात पोहोचवले. या कामगिरीबद्दल त्यांचे देशभरातून कौतुक झाले. तर, मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही त्यांचे विशेष कौतुक केले. मात्र, दुर्दैवाने त्या गंभीर जखमी झालेल्या युवकाने शुक्रवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. 25 वर्षीय युवक उदयकुमार यांच्यावर किलपौक मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बेशुद्ध व्यक्ती 25 वर्षांची होती. ती गुरुवारी स्मशानभूमीजवळ बेशुद्धावस्थेत पडली होती. वादळी पावसात झाड अंगावर पडल्याने या युवकाला गंभीर जखम झाली होती. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सध्या चेन्नईतील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात शनिवारपासून पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे.