जनदाली, दि. 19 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधात नाराजी वाढत चालली असून, पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. जम्मू-काश्मीर नॅशनल स्टुडंट्स फेडरेशनने पीओकेच्या जनदाली भागात काढलेल्या या मोर्चामध्ये मोठया संख्येने नागरीक सहभागी झाले होते. या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादातून इथल्या जनतेच्या मनात पाकिस्तानबद्दल किती रोष आहे ते दिसून येते.
या रॅलीमध्ये पाकिस्तानकडून देण्यात येणा-या अन्याय, अत्याचारी, अमानवीय वागणुकीचा निषेध करण्यात आला तसेच पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जनदालीची शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानकडून इथे दहशतवादी पाठवण्यात येतात असा आरोप स्थानिक नेते लियाकत खान यांनी केला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची रॅली निघालेली नाही. यापूर्वी मे महिन्यातही पीओकेमधील हजीरा येथील डीग्री कॉलेच्या विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे रॅली काढून पाकिस्तानचा निषेध केला होता.
...तर पीओके भारताचा भाग झाला असता !
भारताने नैतिकतेऐवजी लष्करी पर्याय वापरला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा झाला असता, असे मत काही महिन्यांपूर्वी माजी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी व्यक्त केले होते.
देशाच्या हवाई दलाचे सामर्थ्य १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत सरकारकडून पूर्णपणे वापरले गेले नाही अशी हळहळही त्यांनी व्यक्त केली. अरूप राहा म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर हा आमच्या शरीरात रुतलेला काटा आहे. भारताने सुरक्षेच्या गरजांकडे व्यावहारिक दृष्टीने बघितले नाही. आमच्या संरक्षणाच्या गरजांबाबत आमच्यावर आदर्शांनी राज्य केले. त्यामुळे आम्ही व्यावहारिक भूमिका घेतली नाही. सौहार्दाचे वातावरण राखण्यासाठी लष्करी शक्तीकडे दुर्लक्ष केले. भूतकाळात शत्रुंना अटकाव करताना लष्करी शक्ती विशेषत: हवाई दलाचे सामर्थ्य वापरण्यात भारत नाखुष होता, असे राहा म्हणाले.
अरूप राहा म्हणाले की, १९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये टोळयांनी हल्ला केला त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानांनी भारतीय सैनिक आणि उपकरणे प्रत्यक्ष युद्धाच्या स्थळी पोहोचविण्यास मदत केली होती. आणि ज्यावेळी लष्करी उपाय नजरेच्या टप्प्यात होता, तेव्हा आपण नैतिकतेच्या गप्पा मारल्या. प्रश्न शांततेच्या मार्गांनी सुटावा म्हणून आम्ही संयुक्त राष्ट्रांत धाव घेतली.