दी हेग : हेरगिरी आणि घातपाती कारवाया केल्याच्या आरोपावरून दोषी ठरवून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात १८ ते २१ फेब्रुवारी अशी सलग चार दिवस जाहीर सुनावणी होणार आहे.
एप्रिल २०१७ मध्ये जाधव यांना फाशीची शिक्षा झाल्यावर भारताने त्याविरुद्ध या न्यायालयात दाद मागितली. १० न्यायाधीशांच्या खंडपीठाने अंतिम निर्णय होईपर्यंत जाधव यांच्या फाशीची अंमलबजावणी न करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरीश साळवे भारतातर्फे बाजू मांडतील. सोमवारी १८ फेब्रुवारी रोजी त्यांचा युक्तिवाद होईल. १९ तारखेला ब्रिटनमधील क्वीन्स कॉन्सेल खंबर कुरेशी पाकिस्तानची बाजू मांडतील. २० फेब्रुवारी रोजी भारत त्याला उत्तर देईल व २१ तारखेला पाकिस्तानच्या प्रतिजबाबाने सुनावणीची सांगता होईल. न्यायालयाचा निकाल येत्या उन्हाळ्यात अपेक्षित आहे. न्यायालयाच्या वेबसाईटवर व संयुक्त राष्ट्रसंघाच्या वेबटीव्हीवर या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जाईल.