Sonia Gandhi : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा चांगले यश मिळाले आहे. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांची संख्या १०० आहे. त्यामुळे भाजपला केंद्रात तगडं आव्हान मिळालं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आल्याने ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांची आक्रमक भूमिक पाहायला मिळाली. आता माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रे नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वातावरण आपल्या बाजूने आहे म्हणत सोनिया गांधी यांनी नेत्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी सक्रिय झाल्या आहेत. सोनिया गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सीपीपीच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत. आपण आत्मसंतुष्ट आणि अतिआत्मविश्वासात राहू नये, वातावरण आपल्या अनुकूल आहे, आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
"पब्लिक मूड आपल्या पक्षाच्या बाजूने आहे. पण लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी तयार केलेली गती आणि सद्भावना राखण्याची गरज आहे. आपण आत्मसंतुष्ट आणि अतिआत्मविश्वासाने वागू नये. मी असे म्हणण्याचे धाडस करते की जर आपण लोकसभा निवडणुकीत जशी कामगिरी केली तशीच कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात बदल घडून येतील," असे सोनिया गांधी म्हणाल्या.
"लोकसभा निवडणुकीच्या निकालातून मोदी सरकार धडा घेईल असं वाटलं होतं. पण तरीही ते समाजात फूट पाडण्याच्या आणि शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या धोरणावर ठाम आहे. आरएसएस स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणवते. पण संपूर्ण जगाला माहित आहे की ती भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे," अशीही टीका सोनिया गांधी यांनी केली.
कावड यात्रेवरुन केलं भाष्य
कावड यात्रेच्या मार्गाबाबत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने दिलेल्या आदेशावर बंदी घातल्याबाबत सोनिया गांधी यांनी भाष्य केलं. "सुदैवाने सुप्रीम कोर्टाने योग्य वेळी हस्तक्षेप केला. पण हा केवळ तात्पुरता दिलासा ठरू शकतो. नोकरशाहीला आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यासाठी अचानक नियम कसे बदलले गेले ते पहा. त्यांनी स्वतःला एक सांस्कृतिक संघटना म्हणून घोषित केले आहे. पण हा भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे हे साऱ्या जगाला माहीत आहे, असे सोनिया गांधींनी म्हटलं.