नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातच्या धर्तीवर कार्यकर्त्यांनाच ‘लोकाभिमुख जाहीरनामा तयार करण्याचे आणि जनसंपर्कासाठी कार्यक्रम सुरू करण्याचे आवाहन केले.कर्नाटकात या वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखालील समितीने या दृष्टीने अगोदरच प्रक्रिया सुरू केली आहे. कर्नाटकात निवडणुका घोषित करण्याआधीच सर्वसंमतीने काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा तयार होण्याची शक्यता आहे. कर्नाटक प्रदेशचे प्रभारी आणि काँग्रेसचे सचिव मधू गौड याक्षी यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षांनी जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब उमटेल, असा लोकाभिमुख जाहीरनामा तयार करण्यास सांगितले आहे. मागच्या वर्षी सॅम पित्रोदा यांनी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी वडोदरा, अहमदाबाद, राजकोट, जामनगर आणि सूरतच्या नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर, पक्षाने जाहीरनामा तयार केला होता. कर्नाटक प्रदेश काँग्रेस विकासाशी संबंधित सामाजिक-आर्थिक पैलूंवर भर देईल. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारची कामगिरी चांगली असून, अनेक लोकाभिमुख योजनाही सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केल्या आहेत, असेही ते म्हणाले.
जनतेनेच तयार करावा जाहीरनामा, कर्नाटक निवडणूक, राहुल यांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 1:41 AM