टॉयलेटमध्ये हॉस्पीटल! शौचालयात सुरू केलं 'संजीवनी क्लिनिक', यामागचं कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 04:00 PM2022-02-10T16:00:20+5:302022-02-10T16:01:35+5:30

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आरोग्य विभागानं नवा प्रयोग हाती घेत चक्क सुलभ शौचालयात संजीवनी क्लिनिक नावानं रुग्णालय सुरू केलं आहे. यामाध्यमातून झोपडपट्टी भागात राहणाऱ्यांना विशेष सहाय्य मिळत असल्याचा दावा केला जात आहे.

public toilet open sanjeevani clinic hospital bhopal central health department | टॉयलेटमध्ये हॉस्पीटल! शौचालयात सुरू केलं 'संजीवनी क्लिनिक', यामागचं कारण काय? 

टॉयलेटमध्ये हॉस्पीटल! शौचालयात सुरू केलं 'संजीवनी क्लिनिक', यामागचं कारण काय? 

Next

भोपाळ
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आरोग्य विभागानं नवा प्रयोग हाती घेत चक्क सुलभ शौचालयात संजीवनी क्लिनिक नावानं रुग्णालय सुरू केलं आहे. यामाध्यमातून झोपडपट्टी भागात राहणाऱ्यांना विशेष सहाय्य मिळत असल्याचा दावा केला जात आहे. खरंतर या क्लिनिकची सुरुवात २०२० मध्येच झाली होती. पण अशा ठिकाणी उपचार घेण्यासाठी नागरिक थोडे संभ्रमात होते. हळूहळू लोकांमध्ये याची जनजागृती निर्माण झाली. कारण छोट्या छोट्या उपचारांसाठी त्यांना आता सार्वजनिक आरोग्य केंद्रात जाण्याची गरज भासत नव्हती. आज संजीवनी क्लिनिकमध्ये दररोज किमान ४० ते ५० रुग्ण उपचारासाठी येतात. सुलभ शौचालयातच क्लिनिक असल्यानं आपल्या राहत्या घराजवळच नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यास सुरुवात झाली आहे.

क्लिनिक सुरू होण्यासाठी याठिकाणी बंद झालेलं शौचालय असल्यानं खूप दुर्गंधी पसरली होती. पण त्यात सुधारणा आणि स्वच्छतेचं काम करुन चित्रच पालटलं. आता इथं उपचारासाठी येणारे रुग्ण असोत किंवा मग डॉक्टर सर्वजण येथील व्यवस्थेवर खूप खूश झाले आहेत. क्लिनिक सकाळी ९ वाजता सुरू होतं आणि संध्याकाळी ४ वाजता बंद होतं. क्लिनिकमध्ये ईएनटी, ओपीडी, स्क्रिनिंग, मातृ आणि शिशु स्वास्थ्य, किशोर स्वास्थ्य याशिवाय इतर अनेक प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. 

महिला आणि लहान मुलांना मिळताहेत उत्तम उपचार
भोपाळमध्ये सुरू करण्यात आलेल्या या क्लिनिकला याआधी जागा मिळत नव्हती. त्यामुळे बंद झालेल्या शौचालयात या क्लिनिकची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिसराचा कायापालट करुन क्लिनिक सुरू करुन लोकांमध्ये याची जनजागृती निर्माण केली गेली. आता या रुग्णालयात मोठ्या संख्येनं लोक येतात आणि आपल्यासह मुलांचेही उपचार घेतात. ओपीडीमध्ये सर्वसामान्य आजार जसं की ब्लड प्रेशर, मधुमेह तपासणी यासाठी रुग्ण येत असतात. 

Web Title: public toilet open sanjeevani clinic hospital bhopal central health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.